Search

जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन

Category

बातम्या

वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना 33 लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर

मुंबई, दि. 23 : वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना 33  लाख 28 हजार 90 एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे.

वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क मिळवण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या कायद्यानुसार 2019 अखेरपर्यंत अंतिमरीत्या 1 लाख 90 हजार 737 इतके वैयक्तिक व सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले. प्रलंबित असलेले वन हक्क दावे व अपिले यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत विशेष “वनमित्र मोहीम” राबवण्यात आली. यामुळे जमिनीचे हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे.

सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 7 हजार 756 गावांपैकी 356 गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार करण्यात येत आहेत. उर्वरीत गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “सामूहिक वनहक्क व्यवस्थापन पदविका” अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

००००

Advertisements

गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार

मुंबई, दि. 23: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 – बी या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना 250 सदस्यसंख्या असली तरी आता समितीची निवडणूक घेण्याचे विशेष अधिकार संस्थांमधील सदस्यांना  प्राप्त झाले आहेत.

या संस्थांवर कार्यरत असलेली समिती पाच वर्षाच्या कालावधीनंतर देखील संबधित निबंधकाकडून निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त  होवून निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही किंवा काही अडचणी निर्माण होवून निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला तर तीच  समिती  कायम राहात होती. आता त्यात बदल झाला असून 250 सदस्यसंख्या असली तरी संस्थांमधील सदस्यांना समितीची निवडणूक घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील सर्वसाधारण संस्थांना लागू असलेल्या तरतूदी सहकारी गृहनिर्माण  संस्थांना देखील लागू होत होत्या.त्यामुळे या संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असत अशा तक्रारींचे निवारण लवकर व्हावे, त्याबाबतचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, स्पष्ट व्हावे यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 – बी स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे गृहनिर्माण सहकारी सदस्यांना संस्थांबाबतचे दस्तऐवज  मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला. सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती देण्यास संबंधित संस्थेच्या समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने सदस्याने विलंब लावला तर ४५ दिवसानंतर प्रति दिन १०० रुपये जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.तसेच सहयोगी,सह सदस्य,तात्पुरता सदस्य यांच्या व्याखेत सुध्दा अधिक स्पष्टता करण्यात आली आहे.

राज्यामध्ये साधारणत: एक लाखापेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्था असून, नागरी भागातील  70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आहेत. या संस्था बहुतांश शहरी भागातल्या असून, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 – बी स्वतंत्र प्रकरणाचा समावेश केल्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार  प्राप्त झाले आहेत.

०००

सकारात्मक विचारातून सर्वांगीन विकास शक्य प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा – डॉ.विजयकुमार फड

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) – शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्यात अजून एका प्रधानमंत्री किसान मानधन या नव्या योजनेची भर पडली आहे. या योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर विभागीय आयुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी  भांबर्डा, दूधड ग्रामस्थांना आज केले.

सुरवातीला भांबर्डा, नंतर दूधड येथील मंदिरात त्यांनी शेतकरी, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी भांबर्डाच्या सरपंच जनाबाई घोडके, उपसरपंच सुखदेव पठाडे, दुधडच्या सरपंच ताराबाई सुदाम घोडके, उपसरपंच भगवान चौधरी,अप्पर तहसीलदार रमेश मुनलोड, तलाठी वैशाली कांबळे, कृषी सहायक एस.बी.साठे, मदन घुशिंगे, बळीराम बोर्डे, शिवनाथ चौधरी आदींसह ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना देशात लागू करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या 18 ते 40 वयोगट व अल्प भूधारक, सिमांत शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रती माह पेन्शन यातून मिळणार आहे. दुर्देवाने लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची सुद्धा तरतूद आहे. योजनेची नोंदणी सुरू आहे.  नोंदणी करताना कोणतीही रक्कम लाभार्थ्याने भरण्याची आवश्यकता नाही. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थ्याच्या हिश्याची रक्कम आपोआप कपात करण्यात येणार असल्याचेही डॉ.फड यांनी सांगितले. याबरोबरच गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. शासकीय उपक्रमात सहभागी व्हावे. गाव विकासाला प्राधान्य देताना व्यसनमुक्ती, आत्महत्या, शालेय शिक्षण याबाबतही आध्यात्मिक जोड देऊन डॉ. फड यांनी शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. तसेच प्रत्येकाने सकारात्मक विचारातून कृती करावी, त्यातून सर्वांगीण विकास शक्य असल्याचेही डॉ.फड म्हणाले.

श्री. मुनलोड यांनीही शासनाच्या सर्व योजना गाव पातळीपर्यंत पोहचविण्यासाठी शासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ.फड, श्री. मुनलोड यांनी ग्रामस्थांच्या विविध शंकांचे सविस्तरपणे निरसन करून समाधान केले. भांबर्डा येथे वृक्षारोपणही मान्यवरांनी केले. तसेच युवा उद्योजक अर्जुन काळे यांच्या दूध डेअरीची पाहणी करून त्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले.

******

माजी सैनिक, विधवा यांना स्वयंरोजगारांतर्गत आर्थिक मदत

 

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन योजनेंतर्गत संकलित निधीतून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याहस्ते 10 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना रू. 26 लक्ष 18 हजार 593, पोलिस आयुक्त शहर, औरंगाबाद यांचे हस्ते जिल्ह्यातील 7 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना रू. 20 लक्ष 50 हजार 641 असे एकूण जिल्ह्यातील 17 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना एकूण 46 लक्ष 69 हजार 234 रूपयांचे धनादेश ऑगस्ट महिन्यात वाटप करण्यात आले.

यापुढेही माजी सैनिकांस देण्यात येणाऱ्या ध्वजदिन निधीमध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचरी तसेच औरंगाबाद शहरवासीयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

*******

शहीद नायक किरण थोरात यांच्या कुटुंबियांस पोलिस आयुक्त यांच्याहस्ते ताम्रपट प्रदान

 

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील नायक किरण पोपटराव थोरात यांची 4 जानेवारी 2008 मध्ये मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये नियुक्ती होऊन ते जम्मू आणि काश्मीर ‘ऑपरेशन रक्षक’ जिल्हा पूंछमध्ये घाटी येथे धिप-2 चौकीवर तैनात होते. 11 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी पाकिस्तानी सैनिकांनी अचानक गोळीबार चालू केला, त्यावेळी नायक थोरात RCL वर तैनात होते. पाकिस्तानी सैन्याला गोळीबाराचे चोख प्रत्युत्तर देत असताना अचानक शत्रूचा बाँब बंकर तोडून आत घुसला. त्याचा एक तुकडा त्यांच्या मानेला लागला त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन शहीद झाले. अशा वीर पुत्राच्या कुटुंबियांचे 20 ऑगस्ट 2019 रोजी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचेकडून शाल व ताम्रपट प्रदान करून सन्मान करण्यात आला. यावेळी मेजर (निवृत्त) एस फिरासत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,औरंगाबाद उपस्थित होते.

******

शास्त्रीय व लोककला संस्थांना नोंदणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

 

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – शास्त्रीय व लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 24 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार 10 वीच्या परीक्षेत शालेय विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सदर अर्ज संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2019 होता. परंतु मागील आठ दिवसांपासून राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती विचारात घेता विशेष बाब म्हणून सदरचे अर्ज सादर करण्याच अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्यामार्फत कळविले आहे.

******

महिला व बालविकास विभागाच्या पुरस्कारासाठी आवाहन

 

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार बाल कल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in  या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक  31.8.2019 पर्यंत आहे, असे विभागाच्या आयुक्तांनी कळविले आहे.

बालकल्याण पुरस्कार वैयक्तिक पुरस्कारात मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो तर संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

*****

वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी आवश्यक

 

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध मंडळांकडून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. सदर लोकोत्सव हा लोकवर्गणी (देणगीव्दारे) निधी जमवून साजरा केला जातो. जे मंडळ लोकवर्गणीतून उत्सव साजरा करतात अशा मंडळाना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 क अन्वये जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातून वर्गणी जमा करण्याची परवानगी दरवर्षी घेणे आवश्यक असते. सदर कलम 41 क ची परवानगी मंडळाचे सदस्यांना ऑनलाईन व कार्यालयातून समक्ष अर्ज सादर करून (ऑफलाईन) घेता येऊ शकते. ऑनलाईन परवानगी करिता या विभागाची अधिकृत संकेतस्थळ www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज सादर करून मिळविता येऊ शकते. सर्व इच्छुक मंडळानी लवकरात लवकर अर्ज सादर करून परवानगी प्राप्त करून घ्यावी व ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी केले आहे.

 

ज्या संस्था नोंदणीकृत असतील व त्यांच्यामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उद्देश  उद्देशपत्रिकेमध्ये असेल त्यांना वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की, यावर्षी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये महापुराने अनेक लोकांचे घरे उद्धवस्त झालेली असल्यामुळे अशा बाधित पूरग्रस्तांना सामाजिक भावनेतून गणेश उत्सव साधेपणाने साजरा करून पूरग्रस्तांना सढळ हाताने शक्य होईल, तेवढी जास्तीत जास्त मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी केले आहे.

*****

पूरग्रस्तांना न्यास, गणेश मंडळांनी मदत करण्याचे आवाहन

 

औरंगाबाद दि. 22 (जिमाका) – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, औरंगाबाद नोंदणीकृत न्यासाच्या विश्वतांची बैठक धर्मादाय सह आयुक्त सुरेंद्र बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीस कार्यालयातील श.शि. वाळके व सहायक धर्मादाय आयुक्त म.सु. बुधवंत  उपस्थित होते.

बैठकीमध्ये न्यासाचे विश्वस्तांना धर्मादाय सह आयुक्तांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरांमध्ये पूरग्रस्तांना संस्थांमार्फत शक्य होईल तितकी मदत तातडीने करण्याबाबत आवाहन केले. तसेच कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या धर्मादाय रूग्णालयांचे प्रतिनिधी यांना त्यांचेस्तरावरून शक्य होईल ती वैद्यकीय मदत करण्याचे आवाहन बैठकीत केले. धर्मादाय सह आयुक्त यांच्या पूरग्रस्तांना मदतीच्या आवाहनास न्यासांचे विश्वस्तांनी संस्थांमार्फत सर्वोतोपरी मदत करण्याकरिता आश्वस्त केले.

******

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑