1

औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) –मराठवाडा विभागाने 5 कोटी 56 लाख 99 हजार 287 वृक्षांची लागवड करून 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत विभागाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. तसेच राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह सर्व विभागाच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वनाधिकारी यांचे आज दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेस राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षांची लागवड झाली. यामध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, वनाधिकारी यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. आगामी 33 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यास सुरूवात करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

मराठवाडा विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत डॉ. भापकर यांनी वनमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. याही वर्षी राज्याने मराठवाड्याला उद्दिष्ट वाढवून द्यावे. निश्चितच आम्ही ते पूर्ण करू व मराठवाडा हिरवागार करण्यासाठी हातभार लावू, यामध्ये लोकांचा सहभाग अधिकाधिक वाढेल, याचे नियोजन सुक्ष्म पद्धतीने करू. वृक्षाचे संगोपन, लागवड आणि संवर्धनाची विशेष काळजी घेऊ, असेही यावेळी श्री. मुनगंटीवार यांना डॉ. भापकर यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर आदींसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद झाल्यानंतर वन विभागाच्यावतीने डॉ. भापकर यांचे अभिनंदन मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केले.

****